चोपडा (प्रतिनिधी) : - -
महिला मंडळ विद्यालयात संविधान वाचनासह पोक्सो कायद्याबाबत जनजागृती
चोपडा येथील भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील एम.एस.डब्ल्यू. भाग-१ वर्गातील विद्यार्थी वैभव संजय जमदाडे यांच्या क्षेत्रकार्यांतर्गत महिला मंडळ माध्यमिक विद्यालय, चोपडा येथे संविधान वाचन तसेच पोक्सो कायद्याबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पवन देसले हे प्रमुख मार्गदर्शक व अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याची उद्दिष्टे, बालकांचे संरक्षण, कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी तसेच बालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय धनगर गुरुजी, रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री. संजय बारी, ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सुनील बारी, तसेच उपशिक्षक श्री. प्रशांत चव्हाण, श्री. संजय सोनवणे, श्री. विजय पाटील, श्री. परेश चित्ते व सौ. कविता देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी सौ. शिलांबर जमदाडे यांनी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानिक मूल्ये रुजविणे आणि त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना वैभव जमदाडे यांनी केली, तर सूत्रसंचालन श्री. वनराज महाले यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वैभव जमदाडे यांच्या वतीने बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर श्री. संजय बारी यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
क्षेत्रकार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजातील विविध प्रश्नांची जाणीव करून देणे, कायदेविषयक माहिती पोहोचविणे आणि सामाजिक जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, मार्गदर्शक तसेच समाजजागृतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरला.
WhatsApp
No comments:
Post a Comment