चिमणी व सामान्य पक्षी संवर्धनासाठी मोफत जलपात्र व घरट्यांचे वितरण
“ पृथ्वीची आर्त हाक... पक्षी वाचवा निसर्ग वाचवा ”
आपण राहत असलेल्या परिसरातील जैव साखळीतील महत्वाचा घटक म्हणजे पक्षी. या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर घटत आहे. विशेषतः सहजपणे दिसणाऱ्या चिमण्या व अनेक सामान्य पक्षी अनेक कारणांनी नष्ट होत आहेत. जसे की साधी घरे नष्ट करून त्याऐवजी सिमेंटची घरे उभारणे , मोबाईल टॉवर्स , वृक्षतोड , अवकाळी पाऊस , गारपीट , प्रतिकूल हवामान , नैसर्गिक अधिवास नष्ट करणे , ऋतुचक्रातील बदल , वाढते ध्वनी व वायू प्रदूषण, तप्त उन्हाळा इत्यादी. अशा परिस्थितीमध्ये आपण या मुक्या सजीवांबद्दल संवेदनशीलता व जिव्हाळा राखत यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी अतिशय सोपे पण महत्त्वपूर्ण प्रयत्न करायला हवेत. भर उन्हाळ्यात पक्ष्यांना पुरेसे पाणी भरलेली मातीची भांडी घराच्या छतावर , बाल्कनीत , अंगणात तसेच झाडांवर लावून ठेवता येतील .त्याच बरोबर अन्नधान्याने ( बाजरी - तांदूळ ) भरलेला ट्रे , ग्रेन फीडर्स लावता येतील.
तसेच शहरी भागात चिमणी व सामान्य पक्ष्यांना घरटी बांधणे , पिलांचे सुरक्षित संगोपन करणे या जीवन - चक्रातील महत्त्वाच्या टप्प्यांना अल्प संधी लाभते.या कारणास्तव सर्व नागरिकांनी “ एक घर - एक घरटे ”या पक्षी संवर्धन उपक्रमात सहभाग घ्यावा. प्रत्येक घरी खोक्या पासुन बनवलेली अथवा लाकडी घरे योग्य ठिकाणी पक्ष्यांसाठी लावून ठेवावीत. जेणेकरून पक्षी संख्या वृद्धिंगत होण्यात मोठा हातभार लागेल. उष्माघातामुळे अस्वस्थ पक्षी किंवा जखमी असहाय्य पक्ष्यांवर प्रथमोपचार करता येईल. अशारितीने निसर्गातील या सुंदर , आकर्षक , रंगीबिरंगी , आपल्या सर्वांना उपयुक्त अश्या वसुंधरेच्या अलंकाराचे जतन व संवर्धनकरण्यासाठी घरोघरी फिरून आवाहन करण्यात आले.
वरील विचारांचा पाईक होत येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील जागतिक चिमणी दिवस निमित्त तालुक्यातील चुंचाळे , चौगाव , लासूर , सत्रासेन गावात 121 जलपात्र व पक्ष्यांची घरटी मोफत वितरीत करण्यात आली. सोबत प्रबोधन पत्रके देखील वाटप करण्यात आली. नागरिकांशी संवाद साधत सदस्यांनी चिमणी व इतर पक्षी संवर्धनासाठी या कृती उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
या पक्षी संवर्धन कार्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सदस्य अश्विनी पाटील , योगेश देवराज , अनुसुया जोशी , आर्यदीप पाटील , कृष्णाप्रिया पाटील , बुवा तडवी , वनपाल एस एन बारेला , वनरक्षक जे एस कंखरे यांनी विशेष परिश्रम घेतलेत. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील संस्थापक अध्यक्ष हेमराज पाटील यांनी आर्थिक सहयोग भरभरून उपलब्ध करून दिला.तसेच चोपडा वनविभागाचे कर्मयोगी वन अधिकारी प्रथमेश हाडपे साहेब यांनी ग्रामीण परिसरात प्रबोधनासाठी वाहन सेवा व वनभोजन उपस्थितांना उपलब्ध करून देऊन अनमोल योगदान दिले.सातत्याने निसर्ग सेवा व वनविभागाच्या कार्यात मदत करणाऱ्या सातपुडा टीमचे यावल वन विभाग उपवनसंरक्षक पद्मनाभन साहेब , सहाय्यक वनसंरक्षक हाडपे साहेब , वनपरिक्षेत्राधिकारी समाधान सोनवणे साहेब यांनी कौतुक केले.

No comments:
Post a Comment