राष्ट्रसंत प.पू.भय्यूजी महाराज जयंती निमित्त सातपुड्यात वन्यजीवांसाठी मोफत जलटाक्या भेट ...
चोपडा येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे प्रमुख श्री हेमराज पाटील यांच्यातर्फे गुरुदेव राष्ट्रसंत प.पू.भय्यूजी महाराज यांच्या जयंती (29 एप्रिल) निमित्त सातपुडा वनक्षेत्रात वन्यजीवांसाठी मोफत जल टाक्या भेट देण्यात आल्या. हे कृत्रिम जलस्त्रोत नियमित भरण्याची जबाबदारी वनरक्षक सुनील भोई व सुभाष पाटील यांनी घेतली असून संस्थेच्या कार्यात त्यांचे सातत्याने सहकार्य राहिले आहे.
गेल्या मार्च महिन्यात हेमराज पाटील, अश्विनी पाटील, अनिल शिंपी, योगेश देवराज, प्रमोद पाटील , स्वप्निल नेवे यांच्यातर्फे सातपुड्यातील व्यापक वनक्षेत्रात कृत्रिम व नैसर्गिक जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करून वनविभागास नैसर्गिक जलस्रोत स्वच्छ व खोलीकरण करणे , कृत्रिम पाणवठे नियमित भरणे , तसेच काही अपेक्षित ठिकाणी नवीन पानवठयांच्या निर्मिती संदर्भात विनंती करण्यात आली होती. वनविभागातील अपुरे मनुष्यबळ व अनेक पटींचे काम , वणवाच्या समस्या यात जलस्रोतांची जबाबदारी म्हणून वन विभागाचा उत्साह वाढवण्यासाठी हेमराज पाटील यांच्याकडून जल टाकी भेट देण्यात आल्या.
गेल्या काही वर्षांपासून वनविभागाकडे सातत्याने पाठपुराव्याचा परिणाम यावर्षी खूप व्यापक प्रमाणात चोपडा - यावल वन क्षेत्रात दिसून आला आहे.कर्तव्यदक्ष सहाय्यक वनसंरक्षक मा. पी व्ही हाडपे साहेब , तीन वनपरिक्षेत्रांची यशस्वी जबाबदारी पेलणारे वनपरिक्षेत्र अधिकारी मा. एस. एम.सोनवणे साहेब , सर्व वनपाल , वनरक्षक व कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेऊनअनेक जलस्त्रोत जिवंत ठेवले आहेत , कृत्रिम पाणवठे देखील भरले आहेत.
त्यामुळे वनक्षेत्रातील वन्यजीव व पक्ष्यांसाठी जलस्त्रोत उपलब्ध आहेत. थोड्याफार प्रमाणात जे वन्यजीव आपले अस्तित्व टिकवून आहेत त्यांच्यासाठी हे जलस्रोत संजीवनी ठरत आहेत. याच धर्तीवर सातपुड्यातील काही खेडेगावांमध्ये सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर जलपात्र व कृत्रिम घरटे घरोघरी जाऊन मोफत वितरीत करण्यात आली होती. तसेच वनक्षेत्रालगतच्या गावात मोठ्या संख्येने नागरिकांमध्ये याविषयी प्रबोधन करण्यात आले होते.
" इंदोर येथील सद्गुरु दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्ट च्या माध्यमातून राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी आयुष्यभर शेकडो करोड रुपये मानव कल्याणार्थ अडीचशेहून जास्त विविध प्रकारच्या कृती कल्याणकारी योजना राबवण्यासाठी खर्च केले. त्यासोबत संपूर्ण आयुष्य निस्वार्थीपणे सर्व स्तरातील गरजूंच्या समस्या निवारण व कल्याणासाठी वाहून दिले.
येथील सूर्योदय परिवार, इंदोर चे सदस्य श्री हेमराज पाटील व सौ अश्विनी पाटील व पारिवारिक सर्व सदस्य यांनी स्वयं अर्थसहाय्यित सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था चोपडा आणि सूर्योदय वन्य पशुपक्षी मोफत सेवालयाच्या माध्यमातून निसर्ग व वन्यजीव संवर्धनाचे ( Nature CARE = Conservation , Awareness , Research, Education) वर्तमान स्थितीत 51 पेक्षा जास्त विविध कृती योजना संपूर्णतः स्वखर्चाने राबवत आहेत. गुरुदेव यांच्या कार्याने व विचारांनी प्रेरित असलेल्या आमच्या संस्थेला स्थानिक वन विभाग अधिकारी व कर्मचारी , यावल तसेच जळगाव वन विभाग , नाशिक विभागीय वन मंडळाचे सहकार्य लाभते , अशी माहिती श्री अनिल शिंपी यांनी दिली.
ll निसर्ग सेवा हीच ईश्वर सेवा ll

No comments:
Post a Comment