जागतिक बिबट दिनानिमित्त पुनगाव येथे नागरी प्रबोधन अभियानाचे यशस्वी आयोजन ...
" बिबट्या वैरी नव्हे तर सख्खा शेजारी म्हणून सहजीवन स्वीकारण्याचे आवाहन..." - वन्यजीव अभ्यासक हेमराज पाटील.
चोपडा तालुक्याच्या तापी नदी किनारी वसलेल्या पुनगाव येथे 29 एप्रिलला शनिवारी रात्री संजय बाविस्कर यांच्या शेतात सूर्यभान बाविस्कर यांच्या मालकीच्या गायीवर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला होता. तसेच पुनगाव येथे गेल्या दोन वर्षात सात पेक्षा जास्त वेळा बिबट्याने परिसरातील शेळ्या , गाय , बैल , म्हैस , पारडूवर हल्ला करून दहा गुरांची शिकार केलेली आहे. वेळोवेळी संबंधित घटनांची दखल घेत वन अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना पशुधन नुकसान भरपाई देखील देण्यात आली. परंतु दैनंदिन शेतीकामात ग्रामस्थ दिवसा , उशिरा सायंकाळी व रात्री पर्यंत वर्षभर कार्यरत असतात. बिबट प्रभावित शेती क्षेत्रात शेतकरी , मजूर तसेच गावात व गावाबाहेर ये जा करणाऱ्या नागरिकांना बऱ्याच वेळा बिबट्याचे दर्शन झाले तसेच पाऊलखुणा आढळून आलेल्या होत्या. वर्तमान घटनेची माहिती मिळाल्यानंतर चोपडा येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे 3 मे " जागतिक बिबट दिनानिमित्त " येथे मानव बिबट संघर्ष टाळून सहजीवन कसे करता येईल , याविषयी नागरी प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थेचे सदस्य श्री योगेश देवराज यांनी उपस्थित नागरिकांना बिबट्या प्रवण क्षेत्रात वावरण्याची सावधानता व अचानक प्राणी समोर आल्यास काय दक्षता घ्यावी यासंबंधी सचित्र माहिती देऊन नागरिकांच्या मनातील भीती दुर केली.
तसेच उपस्थित नागरिकांच्या प्रश्न व शंकांचे निरसन करून बिबट प्राण्याचा मूळ वनक्षेत्रातील नैसर्गिक अधिवासाचा - हास , वनक्षेत्रातील तृणभक्षक प्राण्यांची जवळपास पूर्णतः घटलेली संख्या , मानवी वस्तीजवळ बिबटचे अनुकूलन करून घेण्याची पूर्ण क्षमता तसेच तेथे सहज भक्ष्य मोकाट कुत्रे व गुरढोर उपलब्ध असल्याने मानवी वस्तीजवळ दिवसेंदिवस मार्जार कुळातील या प्राण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे जवळच्या भविष्यात तालुक्यातील अनेक ग्राम क्षेत्रात तसेच मुख्य शहरा बाहेरील शेत परिसरात बिबट प्राण्याचे अस्तित्व अधिक जाणवेल. म्हणून बिबट हा वैरी नसून सख्खा शेजारी आहे , या पूर्ण मानसिकतेने मानवास या प्राण्यासोबत सहजीवन स्वीकारणे भाग पडेल , असे प्रतिपादन वन्यजीव अभ्यासक श्री हेमराज पाटील यांनी केले. तसेच शेतातील पूर्णतः कोरड्या विहिरीना बुजणे , मोठ्या विहिरींभोवती संरक्षक कठडे उभारणे व विहिरींवर मजबूत जाळी लावण्याची माहिती देखील देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत बिबट प्राण्यावर
रोष व्यक्त करून त्यास ठार करू नये त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण अधिनियमाची (1972 - कलम 9) माहिती देण्यात आली.
पुनगाव येथील प्रत्येक गल्ली परिसरात घरोघरी जाऊन 261 प्रबोधन पत्रकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी , गृहिणी , वयस्क मंडळी व नागरिकांशी सर्व सदस्यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन बिबट प्राण्याची माहिती , शेत परिसरात वावरताना घ्यायची काळजी इ.बाबत मार्गदर्शन करून सुसंवाद साधला. यावेळी मजूर व महिला वर्गाचा दांडगा प्रतिसाद लाभला. त्याचबरोबर प्रसार माध्यमाद्वारे पुनगाव व मितावली येथील जवळपास 2500 नागरिकांपर्यंत बिबट्या सोबत सहजीवनसूत्राची माहिती पोहोचवण्यात आली.
नागरी प्रबोधनाच्या यशस्वीतेसाठी सदस्य योगेश देवराज , अश्विनी पाटील , अमोल डूडवे , आर्यदीप पाटील , जयेश बडगुजर , ग्रामसेवक प्रवीण पाटील , सतिष सोनवणे , संतोष बाविस्कर, मधुकर सोनवणे , गोरख बाविस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजहित कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक सोपान बाविस्कर , मधुकर सोनवणे तसेच सरपंच किशोर बाविस्कर यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. वन्यजीव संदर्भात मोफत मदतीसाठी वन विभाग - 1926 व चोपडा तालुक्यासाठी 9922085434 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

No comments:
Post a Comment