हिवाळी पक्षी प्रगणनेत आढळल्या 181 हून अधिक पक्षी प्रजाती ; जिल्ह्यातील अनेक जलाशयांचे सर्वेक्षण...
भारतात हिवाळ्यात उत्तर गोलार्धातील रशिया , सायबेरिया , चीन , मंगोलिया , युरोप , कझाकिस्तान , उत्तर भारतातील लडाख , काश्मीर इत्यादी प्रदेशातून पक्षी स्थलांतरित होतात. या हिवाळी पाहुण्यांचे सर्वेक्षण व नोंदी करण्यासाठी सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेने शिरपूर , चोपडा , यावल , अमळनेर , पारोळा , एरंडोल , जामनेर , भुसावळ , मुक्ताईनगर , जळगाव येथील अनेक पाणथळ प्रदेश , हंगामी व बारमाही तलाव व विविध डॅमवर डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत भेट देऊन आशियाई पाणपक्षी प्रगणना केली.
@ रामसर साईट नल सरोवर पक्षी सर्वेक्षण @
आंतरराष्ट्रीय स्थलांतरित पक्षी अधिवास क्षेत्र नल सरोवर (गुजरात) पक्षी अभयारण्यास भेट देऊन येथे दोन दिवसात 165 पेक्षा अधिक विदेशी पक्षी प्रजातींच्या छायाचित्रणासह नोंदी घेण्यात आल्या.
$ या बातमीतील सर्व फोटो नल सरोवर , गुजरात व जळगाव जिल्ह्यातील विविध पाणथळ ठिकाणी श्री हेमराज पाटील यांनी टिपले आहेत. $
* जागतिक पाणथळ प्रदेश दिन *
तसेच 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त पक्षी निरीक्षण करून वरील पाणथळ प्रदेशांची मूल्यांकन माहिती व पक्षी सर्वेक्षणाचे अहवाल नोंदणीकृत वेटलँड मित्र श्री हेमराज पाटील यांनी वेटलँड इंटरनॅशनल ( साउथ एशिया ) यांच्याकडे सादर केली. 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान महाप्रांगण पक्षी प्रगणना , परिसरातील सामान्य पक्षी परिचय यासारखे कार्यक्रम आयोजित केलेत.
# सातपुडा पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास क्षेत्र #
वर्षभर सातपुड्यात पक्षी , वन्यजीव व जैवविविधता अभ्यासासाठी भटकंती करणाऱ्या श्री हेमराज पाटील यांनी या वर्षात केलेल्या शास्त्रीय नोंदी डेटातील मध्य आशियाई मार्गाने भारतात स्थलांतरित होणाऱ्या 83 पक्षी प्रजातीची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्क येथील पक्षी शास्त्रज्ञांनी 2023 च्या संशोधन अहवालात सलग पाचव्यांदा गृहीतके म्हणून उपयोगात घेतलीत व त्यांचे अभिनंदन केले.
@ पाणथळ प्रदेशांचे सातत्याने सर्वेक्षण @
या सर्वेक्षणासाठी मालापुर , खारी तलाव , मराठा , खामखेडा , अनेर , मालापूर धरण , वाघझिरा , निंबादेवी , वाघुर , कंडारी , मेहरूण , हतनुर , बल्या मारुती , कंकराज , म्हसवे , अंजनी , तापी - पूर्णा संगम येथील जलस्त्रोतांवर भेट देऊन 39 सर्वे रिपोर्ट तयार केलेत. या सर्व ठिकाणाहून एकूण 181 पेक्षा जास्त स्थानिक व विदेशी स्थलांतरित प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आली.
पक्षी प्रगणनेत प्रामुख्याने नयन सरी , थापट्या , मलीन , तरंग , तलवार , चक्रांग , मोठी लालसरी , शेंडी, वारकरी , भुवई , नकटा ,चक्रवाक , काणूक , छोटी लालसरी इ. प्रकारचे बदक तसेच चित्रबलाक , करकोचे , बगळे , पानकावळे तसेच शाखाधारी पक्षी पळस मैना , गप्पीदास , विविध माशीमार , चंडोल , तीर चिमणी , परीट , कुरव , सुरय, विविध गरुड , शिकारी पक्षी आढळून आलेत.
यासाठी अश्विनी पाटील , आर्यदीप पाटील , घनश्याम वैद्य , अमोल डूडवे , शब्बीर बेलीम , कल्पेश सूर्यवंशी , अश्फाक पिंजारी , शबनम पिंजारी , कृष्णप्रिया पाटील , धनंजय बागुल यांनी परिश्रम घेतलेत. यापूर्वी पक्षी अभ्यासाच्या संपूर्ण नोंदी व डेटा यावल वनविभागास उपलब्ध करून देण्यात आला. त्याबद्दल यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री जमीर शेख , सहाय्यक वनसंरक्षक श्री प्रथमेश हाडपे , वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एस एम सोनवणे , श्री बी के थोरात , श्री जी बी बडगुजर , श्री आनंदा पाटील , श्री अजय बावणे , श्री सुनील भिलावे , सर्व वनपाल व वन कर्मचारी यांनी पक्षी व वन्यजीव अभ्यासक हेमराज पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment