चोपडा तालुक्यातील कोळी बंधूंची कला सातासमुद्रापार....! !
संसार गाड्याला छंदाचा आधार ...
एखाद्याला एखादी कल्पना सुचावी, पुढे तो छंद बनावा आणि त्या छंदाचे रूपांतर व्यवसायात होऊन तेच उदर निर्वाहाचे साधन बनावे. आणि तीच पायवाट धुंडाळत आयुष्याची किरणे दिसावित असे कधीनवद घडते. तेच चुंचाळे, ता.चोपडा, जि.जळगांव येथील कोळी बंधूंच्या बाबतीत झाले आहे.
चोपडा आगारात चालक असलेल्या भगवान महारु कोळी यांची मुले पवन भगवान कोळी आणि मोहन भगवान कोळी यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चे पहिल्या पासूनच आकर्षण होते. घराची परिस्थिती बेताचीच असल्याने आणि अनुक्रमे बारावी आणि बी ए चे शिक्षण झालेल्या कोळी बंधूना अगोदर पासूनच कागदाच्या कलाकृती बनवण्याची सवय होती. त्यातूनच आकर्षणापोटी त्यांनी कागदाची एस टी बस बनवली. त्यासाठी त्यांना वडिलांचे मार्गदर्शन मिळाले.
मग छंदाला धुमारे फुटू लागले.आणि नव्या कल्पनेने मनात घर केले. आणि एक दिवस ऍक्रेलीक फोम शिट वापरून बस ची निर्मिती झाली. पूर्वी मोबाईल फोन च्या दुकानाचे अनुभव असल्यामुळे बस मध्ये लायटिंग ची सुविधाही झाली. कलारींग साठी झिकझॅक मशीनचा आणि सी एन सी मशीनचा वापर करून दरवाजे, खिडक्या, चाके, कॅरिऍर, सर्वच बनून सुंदर बस तयार झाली.
वडील राज्य परिवहन महामंडळाच्या चालक असल्याने राज्यभरात कर्मचाऱ्यांना माहिती झाली. त्यातून मागणी वाढली. मग हळूहळू पोलीस व्हॅन, अग्निशमन गाडी, ट्रक, टेम्पो, बोलेरो, पीक अप व्हॅन, बँड गाडी, अँबू लस, जीप ची निर्मिती होत गेली. आता या सर्व प्रकाराबरोबरच कोळी बंधु गोव्याची कदंबा बस, हरियाणा आणि गुजरातच्या बस चे मॉडेल बनवतात.त्यावर राज्य महामंडळाचे नाव, बस जात असलेल्या गावाचे बोर्ड, आगाराचे नाव असलेली हुबेहूब बस ते तयार करतात.
मधल्या काळात राज्यातील वेगवेगळ्या आगारातील अधिकाऱ्यांशी परिचय झाला आणि बस मॉडेलची मागणी झाली. त्यातून पत्री आणि लाकडी मॉडेलही बनवणे सुरू झाले आहे. कोळी बंधूंनी बनवलेल्या बस चोपडा आगार, पिंप्री चिंचवड चे भक्ती शक्ती आगार, अकोला आगारात आहेत. पुणे येथील डॉ.गावडे यांनी गाडी नेली ती पाहून त्यांच्या मध्यस्तीतून सायप्रस, इंग्लंड आणि दुबईतही कोळी बंधूनी बनवलेल्या बस पोहचल्या असल्याचे त्यांनी S महाराष्ट्र 7 न्युज शी बोलतांना सांगितले.
आता ते मागणी प्रमाणे लहान मोठी वाहने बनवू लागले आहेत. दीड फुटापासून पाच फूट पर्यंत लांब असलेली वाहने ते बनवितात. आता अजूनही सफाईदारपणा आणत व्यवसाय वाढविण्याचा त्यांचा मानस आहे.
वडीलांसह शिक्षक बी जी महाजन, अली खाटीक, नाशिकच्या सुकमल आर्ट्स चे निवृत्ती वाघ, एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर, चोपड्याचे संदेश क्षीरसागर आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे कोळी बंधूनी सांगितले. त्यांच्या मतानुसार खानदेशात तरी त्यांच्या कले सारखा छंद पुढे कोणी नेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुचेल ती कल्पना आणि मॉडीफिकेशन करण्यावर त्यांचा भर आहे.

No comments:
Post a Comment