प्रभावी अध्यापन, समुपदेशन व मूल्यशिक्षणावर भर देणारी दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

14/06/2025

प्रभावी अध्यापन, समुपदेशन व मूल्यशिक्षणावर भर देणारी दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          प्रभावी अध्यापन, समुपदेशन व मूल्यशिक्षणावर भर देणारी दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...

           पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दि. 12 व 13 जून  रोजी दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आधुनिक अध्यापन तंत्र, बालमानसशास्त्र, वक्तृत्व कौशल्य, समुपदेशन आणि मूल्यशिक्षण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांवर यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सखोल मार्गदर्शन केले.

          कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रथम सत्रात प्रवीण भदाणे (पिंपळकोठा) यांनी “बालमानसशास्त्र व अध्यापन कौशल्य” या विषयावर शिक्षकांशी संवाद साधला. त्यांनी बालकांचा मानसिक विकास, त्यांच्या शिकण्याच्या पद्धती, वयोगटानुसार अध्यापन पद्धतीत असलेले बदल तसेच शिक्षकांनी वापरायच्या कल्पक व प्रभावी अध्यापन तंत्रांची माहिती दिली.

          त्यानंतर द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ. संजीव गिरासे (स्व. अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी, ता. साक्री  जि. धुळे) यांनी “वक्तृत्व आणि अध्यापन कौशल्य” या विषयावर अनुभवसिद्ध आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षकांच्या सादरीकरणशैली, भाषा, आत्मविश्वास आणि प्रभावी संवादकौशल्य यावर भर दिला.
          दुसऱ्या दिवशी प्रथम सत्रात ब्रह्माकुमारीज डॉ. वैष्णवी खैरनार (जळगाव) यांनी “शिक्षण क्षेत्रासाठी प्रभावी समुपदेशनाचे तंत्र” या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशनाचे महत्त्व, संवादातील समजूतदारपणा, श्रवण कौशल्य, आणि समुपदेशनामधील व्यावहारिक तंत्रे त्यांनी प्रात्यक्षिकासह स्पष्ट केली.

          द्वितीय सत्रात, ब्रह्माकुमारीज शीतल बेलदार (चोपडा) यांनी “मूल्यशिक्षण – काल, आज आणि उद्या” या विषयावर सर्जनशील पद्धतीने सादरीकरण केले. जीवनमूल्यांचा अभ्यास, नैतिक शिक्षण, मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक रुजवणूक यावर त्यांनी विविध अ‍ॅक्टिव्हिटी व उदाहरणांद्वारे उपस्थितांना प्रभावीपणे समजावून सांगितले.

         सदर कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी सर्व विभागप्रमुख, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

          या कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी आपल्या अध्यापन पद्धतीत नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याची प्रेरणा घेतली. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे प्रशिक्षणार्थींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज