चोपडा (प्रतिनिधी) : - -
प्राचीनता, मौलिकता, अखंडता, स्वयंभूपण ही आपल्या अभिजात मराठी भाषेची वैशिष्ट्ये आहेत व्याख्याते रामचंद्र पाटील यांचे प्रतिपादन
भाषा माणसाला माणसाशी जोडण्याचे संपन्न साधन आहे. भाषेमुळे मानवी संस्कृती टिकून राहते. हेच महत्वाचे कार्य आपल्या माय मराठी भाषेने गेल्या 2 हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून केले आहे. दरवर्षी मराठी भाषेत 2000 हजार पुस्तके, 500 दिवाळी अंक छापली जातात. तर वर्षभरात विविध स्तरावरील 200 पेक्षा अधिक मराठी भाषेतील साहित्य संमेलने होत असतात. प्राचीनता, मौलिकता, अखंडता, स्वयंभूपण ही आपल्या अभिजात मराठी भाषेची वैशिष्ट्ये असल्याचे सांगत मराठी भाषा कधीही नष्ट होणार नाही, असा विश्वास जळगाव येथील व्याख्याते रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेतर्फे आयोजित मसाप प्रियजन स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना येथील पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात बोलत होते. मराठी भाषा गौरव दिवसाचे औचित्य साधून 'माझ्या मराठीची बोलु कौतुके' या विषयावर मराठीच्या गौरवशाली परंपरेचा पट त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. या व्याख्यानाचे प्रायोजक जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, रोटरी क्लबचे अध्यक्ष आशिष जयस्वाल, मानद सचिव विश्वास दलाल, शशिकांत पाटील (वढोदा) हे होते.
यावेळी विषय अधिक तपशीलवार मांडताना ते म्हणाले, राष्ट्र संपवण्यासाठी एखाद्या राष्ट्राची भाषा संपवावी पर्यायाने संस्कृती नष्ट करता येईल हा विचार मनात ठेवून लॉर्ड मेकॉलेने तत्कालीन परिस्थितीत भारतात शिक्षण पद्धती राबवली. आपल्या भाषेवर अनेक आक्रमणे झाली. परदेशी आक्रमक केवळ तलवारीच्या जोरावर राज्य करत नाहीत तर ते भाषा आणि संस्कृती लादत असतात त्यामुळे अनेक भाषा काळाच्या ओघात नष्ट झाल्यात. असे असले तरी आपली मराठी भाषा आजही टिकून आहे आणि जगभरातील 72 देशात मराठी बोलली जात असून सुमारे 83 दशलक्ष मराठी भाषिक जगात आहेत.
भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी भाषा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मराठीत 40 बोलीभाषा आहेत. मराठी संस्कृतच्या प्रभावातून नव्हे तर त्याही आधी जन्मली आहे. सातवाहन राजांच्या दरबारात मराठी भाषा घुमली आणि यादवांच्या राजाश्रयात ती फुलली, लीळाचरित्राच्या रूपाने तिच्या साहित्य यात्रेची सुवर्णपानं उघडली गेली. मराठीतील संत साहित्याने मराठी मनाचा कणा ताठ करत न्यूनगंड कमी केला. संतानी त्यांच्या अभंगातून भक्ती जागवत समाज जागृती केली. महानुभाव पंथाने मराठीला धर्मभाषा बनवले. जगातल्या अनेक भाषांमध्ये राष्ट्रगीते लिहिली गेलीत; मराठीत मात्र पसायदानाच्या रूपात विश्वगीत लिहिले गेले. जिथे प्रत्येक शब्दांत स्वाभिमान धगधगतो ती ओळख, ती ताकद आणि ती ज्वाला म्हणजे मराठी होय, असे सांगत ओघवत्या शब्दांत, अभ्यासपूर्ण ऐतिहासिक संदर्भ आणि माहिती देत मराठी भाषा संपणार ही चिंता व्यर्थ आहे फक्त आपण आपला न्यूनगंड सोडला पाहिजे असे मत रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखेचे कार्याध्यक्ष विलास पं पाटील यांनी, सूत्रसंचालन पवन लाठी यांनी, वक्त्यांचा परिचय कार्यवाह गौरव महाले यांनी व आभार प्रदर्शन तुषार लोहार यांनी केले. व्याख्यानास डॉ. विकास हरताळकर, डॉ. सुरेश बोरोले, शाखेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्यासह श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
WhatsApp
No comments:
Post a Comment