चोपडा (प्रतिनिधी) : - -
चोपडा शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास ; धरणगाव रोड ते तिरंगा चौक परिसरातील अतिक्रमणावर नगरपरिषदेची हातोडा.....
चोपडा शहरातील रस्ते मोकळे, वाहतूक सुरळीत आणि शहराचे सौंदर्य अधिक खुलून दिसावे, या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने आज धरणगाव रोड, सभापती बंगला ते तिरंगा चौक आणि पंकज स्टॉप ते यावल रोड या परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. नगरपरिषदेच्या या धडक कारवाईमुळे या भागातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून, नागरिकांमध्येही या मोहिमेबाबत सकारात्मक भावना व्यक्त होत आहेत.
अतिक्रमण हटविण्यापूर्वी नगरपरिषदेच्या वतीने टपरीधारक तसेच दुकानांसमोर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना दोन दिवस अगोदरच सूचना व ताकीद देण्यात आली होती. नगरपरिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक टपरीधारक व नागरिकांनी स्वतःहून आपापले अतिक्रमण काढून घेतले. मात्र, सूचना देऊनही ज्यांनी अतिक्रमण कायम ठेवले, त्यांच्यावर आज सकाळी 9 वाजेपासून प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सुमारे 20 टपऱ्या तसेच 30 ते 35 ठिकाणचे विविध प्रकारचे अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईसाठी 2 जेसीबी, 3 ट्रॅक्टर तसेच नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. कारवाईदरम्यान अतिक्रमण हटविण्यासाठी वापरलेले साहित्य, टपऱ्या व इतर वस्तू नगरपरिषद प्रशासनाने ताब्यात घेऊन नगरपरिषद परिसरात जमा केल्या. @ मुख्याधिकारी स्वतः मैदानात ; कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह @
नवनियुक्त मुख्याधिकारी विवेक पंडितराव धांडे यांनी या मोहिमेला विशेष महत्त्व देत सकाळपासून स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कारवाईची पाहणी केली. केवळ कार्यालयातून आदेश न देता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले. त्यावेळी नगर अभियंता दिगंबर वाघ, अतिक्रमण विभाग प्रमुख महेश जोशी, उपमुख्याधिकारी संजय मिसर, संदीप गायकवाड आस्थापना प्रमुख, स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंखे, विद्युत अभियंता प्रमोद पाटील यांच्यासह नगरपरिषदेचे बहुतांशी अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून घेतलेली मेहनत ही शहराच्या स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध भविष्यासाठी प्रशासनाची बांधिलकी अधोरेखित करणारी ठरली.
मुख्याधिकारी विवेक पंडितराव धांडे यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले की, नगरपरिषदेची कारवाई ही कोणालाही त्रास देण्यासाठी नसून शहरातील रस्ते मोकळे, सुरक्षित आणि सर्वांसाठी सुलभ करण्यासाठी आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अद्याप अतिक्रमण आहे, ते संबंधित नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईची वाट न पाहता स्वतःहून काढून घ्यावे. “शहर हे केवळ प्रशासनाचे नसून प्रत्येक नागरिकाचे आहे. रस्ते मोकळे असतील तर वाहतूक सुरळीत होईल, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे जाता येईल आणि शहराचे सौंदर्यही वाढेल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे. शहराच्या विकासासाठी ‘शहर प्रथम’ ही भावना सर्वांनी स्वीकारणे आवश्यक आहे,” असे आवाहन मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी केले.
अतिक्रमण हटविल्यानंतर या मार्गावरील रस्ते अधिक रुंद आणि मोकळे दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी अतिक्रमणामुळे झाकलेला परिसर आता अधिक स्पष्टपणे दिसत असून, उपजिल्हा रुग्णालयाची इमारतही रस्त्यावरून स्पष्टपणे नजरेस पडू लागली आहे. रस्त्याची दृष्टीक्षमता वाढल्याने दूरपर्यंतचा परिसर सहज दिसत असून, वाहतुकीच्या दृष्टीनेही याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. रस्ते मोकळे झाल्यामुळे भविष्यात शहरातील महत्त्वाच्या शासकीय इमारती, सार्वजनिक सुविधा आणि परिसर सामान्य नागरिकांना सहज दिसतील. त्यामुळे नागरिकांमध्ये त्या सुविधा, त्यांचे महत्त्व आणि उपलब्ध शासकीय सेवांबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. या कारवाईनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना एका नागरिकाने सांगितले की, “रस्त्यावरचे अतिक्रमण कमी झाले की शहराचा खरा चेहरा दिसतो. आज रस्ता मोकळा झाल्यामुळे दूरपर्यंतचा परिसर दिसत आहे. उपजिल्हा रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय इमारतीही आता स्पष्ट दिसत आहेत. शहरातील रस्ते असेच मोकळे राहिले तर चोपडा निश्चितच अधिक सुंदर दिसेल. महत्त्वाच्या शासकीय सुविधा नागरिकांच्या नजरेस पडतील आणि त्या सुविधांचा लाभ घेण्याबाबतही नागरिक अधिक जागरूक होतील. नागरिकांनीही प्रशासनाच्या कारवाईला सहकार्य करण्याची भूमिका घेतली असून, अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अतिक्रमण हटाव मोहिमेत लोकप्रतिनिधींनीही समजूतदारपणाची भूमिका घेत व्यक्तीपेक्षा शहर आणि शहराच्या हिताला प्राधान्य देण्याचा संदेश दिला. शहरातील रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि सौंदर्य यांचा विचार करून प्रशासनाच्या विकासाभिमुख भूमिकेला सहकार्य करण्याची भूमिका घेण्यात आली. ही बाब शहराच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयातून शहर विकासाला गती मिळू शकते, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी करण्यामध्ये नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकजूट विशेष उल्लेखनीय ठरली. सकाळ पासून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जेसीबी, ट्रॅक्टर आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने अतिक्रमण हटविणे, रस्त्यावरील साहित्य बाजूला करणे, परिसर स्वच्छ करणे आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेणे, अशी विविध कामे कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने पार पाडली. “प्रशासन आदेश देत नाही, तर स्वतः पुढे येऊन काम करते,” असा सकारात्मक संदेश या मोहिमेतून नागरिकांमध्ये गेला आहे. मुख्याधिकारी स्वतः सकाळपासून उपस्थित राहिल्याने अधिकारी - कर्मचाऱ्यांमध्येही काम करण्याचा उत्साह वाढला.
शहराचा नियोजनबद्ध विकास, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, स्वच्छता, सुरक्षितता आणि सौंदर्यीकरण यासाठी रस्ते मोकळे ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आजची कारवाई ही केवळ अतिक्रमण हटविण्यापुरती मर्यादित न राहता ‘मोकळे रस्ते – सुंदर शहर’ या व्यापक संकल्पनेची सुरुवात ठरावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. चोपडा नगरपरिषदेने नागरिकांना कारवाईपूर्वी संधी देत स्वेच्छेने अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते. अनेक नागरिकांनी त्याला प्रतिसादही दिला. त्यामुळे पुढील काळात नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईची वाट न पाहता स्वतःहून अतिक्रमणमुक्त शहरासाठी पुढाकार घ्यावा, हीच या मोहिमेची खरी अपेक्षा आहे. शहराचा रस्ता मोकळा झाला की केवळ वाहतूक मोकळी होत नाही; शहराचा विकास, सौंदर्य आणि नागरिकांच्या सुविधांकडे जाणारा मार्गही मोकळा होतो.
WhatsApp
No comments:
Post a Comment