चोपडा (प्रतिनिधी) : - -
तुळशिदास कोळी यांच्या लढ्याला यश वडतीच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबीत.....
धान्यसाठ्यात तफावत उघड, अमानत रक्कम जप्त करत परवाना निलंबित, 8038 रु. वसुलीचा आदेश
चोपडा तालुक्यातील मौजे वडती येथील वैष्णवी स्वयंसहाय्यता महिला बचत गट संचलित स्वस्त धान्य दुकानाविरुद्ध धान्य वितरणातील अनियमितता, नियमभंग आणि साठ्यातील तफावत संदर्भात मौजे वडती येथील रहिवासी तुळशिदास निंबा कोळी यांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानाच्या कारभाराबाबत तहसील कार्यालय - चोपडा तसेच जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पुरवठा विभाग व तहसील प्रशासनाकडून प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान लाभार्थ्यांचे जबाब, साठा नोंदवही, वितरण नोंदी, प्रत्यक्ष उपलब्ध धान्यसाठा तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालांची पडताळणी करण्यात आली.
या तपासणीत दुकानात शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक माहिती फलक न लावणे, लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनच्या पावत्या न देणे, धान्य वितरणाच्या नियमांचे पालन न करणे तसेच दुकानातील स्वच्छता व पारदर्शकतेबाबत त्रुटी आढळून आल्या. याशिवाय, लाभार्थ्यांनी महिन्यातून केवळ 2 ते 3 दिवस धान्य वितरण केले जात असल्याची तक्रार केल्याचेही चौकशीत समोर आले. प्रत्यक्ष साठा तपासणीदरम्यान साठा रजिस्टरमधील नोंद आणि दुकानात उपलब्ध असलेला धान्यसाठा यामध्ये तफावत आढळून आली. तपासणीत तांदूळ 1•14 क्विंटल , गहू 0•47 क्विंटल आणि ज्वारी 0•42 क्विंटल इतका साठा कमी असल्याचे निदर्शनास आले.
या धान्य तफावतीमुळे शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील नियमांचे उल्लंघन झाल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले. या प्रकरणात संबंधित स्वस्त धान्य दुकान चालक तसेच तक्रारदार यांना आपली बाजू मांडण्यासाठी सुनावणीची संधी देण्यात आली. दोन्ही बाजूंचे खुलासे, तहसीलदारांचा अहवाल, पुरवठा निरीक्षकांची तपासणी आणि गोदाम व्यवस्थापकांच्या नोंदींचा सखोल अभ्यास केल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी अंतिम आदेश पारित केला. आदेशानुसार तफावतीच्या धान्यापोटी शासनाच्या आर्थिक नुकसानीची वसुली करण्यात येणार आहे. त्यामध्ये तांदळासाठी - 5006•25 रु., गव्हासाठी - 1478•35 रु. आणि ज्वारीसाठी 1553•58 रु. अशी एकूण 8038•18 रु. रक्कम संबंधित दुकानाकडून वसूल करण्यात येणार आहे. वसुली होईपर्यंत लागू असलेले व्याजही आकारण्यात येणार आहे. धान्य तफावतीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित स्वस्त धान्य दुकानाची अनामत रक्कम शासनाकडे जमा करून दुकानाचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित झाल्याने लाभार्थ्यांना धान्य मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी संबंधित शिधापत्रिका जवळच्या इतर स्वस्त धान्य दुकानाला तात्पुरत्या स्वरूपात जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता, शिस्त आणि लाभार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने केलेल्या या कारवाईची चोपडा तालुक्यात चर्चा सुरू आहे. धान्यसाठ्यातील तफावत, नियमभंग किंवा लाभार्थ्यांच्या हक्कांशी संबंधित अनियमितता आढळल्यास प्रशासन कठोर कारवाई करू शकते, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून स्वस्त धान्य दुकानदारांना मिळाला आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment