चोपडा (प्रतिनिधी) :--
निमगव्हाणच्या नागरिकांनी समजून घेतली बिबट्या बाबतची खबरदारी...
संघर्ष नव्हे तर सहजीवन सूत्रांचा ग्रामस्थांनी केला स्वीकार , वनविभागास सर्वतोपरी सहकार्याचे दिले आश्वासन.
चोपडा तालुक्याच्या दक्षिणेला तापी नदी तीरावर स्थित निमगव्हाण गावात गेल्या आठवड्यात मध्यरात्री बिबट्याने बापू आत्माराम बाविस्कर यांच्या खळयातील म्हशीचे पारडू भक्ष केले होते. तसेच तापी नदीकिनारी काही दिवसांपूर्वी रानडुकराची शिकार केली होती. या घटनेमुळे ग्रामस्थ धास्तावले होते. चोपडा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व नुकसान झालेल्या पशुधनाची भरपाईची कार्यवाही केली होती.
परंतु भयभीत झालेल्या नागरिकांचा आत्मविश्वास बळावण्यासाठी चोपडा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एस एम सोनवणे यांनी नागरी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले.यासाठी तालुक्यातील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे मार्गदर्शक व वन्यजीव अभ्यासक श्री हेमराज पाटील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना आपल्या प्रबोधनातून मानव - वन्यजीव संघर्षाकडून सहजीवन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या मंचावर सरपंच दिनेश सपकाळे , उपसरपंच देवानंद पाटील , वनपरिक्षेत्र अधिकारी एस एम सोनवणे , हेमराज पाटील, अश्विनी पाटील , पोलीस पाटील पवन भिल्ल , राजेंद्र भाटिया , धनराज बाविस्कर , संजय बिऱ्हाडे उपस्थित होते.
नागरिकांशी सुसंवाद साधताना सुरुवातीला हेमराज पाटील यांनी बिबट्या प्राण्याची ओळख , त्याचे भक्ष , जीवनमान , स्वभाव वैशिष्ट्ये , पगमार्क्स इ. विषयी माहिती दिली. नैसर्गिक अधिवासाचा -हास , परिसरातील अन्नसाखळीतील तृणभक्षक प्राण्यांची घटती संख्या व नागरी वस्तीच्या जवळपास अनुकूलन करून घेण्याची क्षमता या कारणाने मार्जार कुळातील बिबट या वन्य प्राण्याचे मानवी वस्तीलगत शिरकावाचे प्रसंग वाढत आहेत.अशा प्रसंगी मानवी समुदायात वन्यजीवांप्रती अनास्था निर्माण होऊन तणाव परिस्थिती उद्भवू शकते. त्याकरिता बिबट्या प्रवण क्षेत्रातील लोकांनी सहजीवन सूत्रांचा अवलंब करण्याचे सूचित केले. बिबट्या रात्री अधिक सक्रिय असल्याने एकट्याने बाहेर पडणे टाळावे , पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात राखावी , वृद्ध व बालकांना एकटे सोडू नये , परिसरात स्वच्छता राखावी , शेतात आवाज करत राहावे तसेच बिबट्या दिसल्यास घाबरून पळून जाऊ नये , त्याला डिवचू नये , उभ्या पिकात विशेषत: ऊस व केळीच्या शेतात सावधानता बाळगावी , पिले आढळून आल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे . तसेच बिबट्या हा अनुसूची 1 मधील महत्त्वाचा वन्यप्राणी असल्याने त्यास इजा करणे अथवा शिकार करणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील कलम 9 अन्वये गुन्हा असून असे करणाऱ्यास सात वर्षे कारावास व आर्थिक दंडाची तरतूद आहे इ. बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर उपस्थितांचे प्रश्न व शंका निरसन करून ग्रामस्थांनी संयम राखावा असे श्री सोनवणे यांनी आवाहन केले. उपस्थित सर्व नागरिक ,ग्रामपंचायतीचे सर्व लोकप्रतिनिधी व वन विभाग कर्मचारी यांनी वन्यजीव संरक्षणाची हेमराज पाटील यांच्या सोबत प्रतिज्ञा घेतली. ग्रामपंचायत सदस्य संजय बिऱ्हाडे यांनी ग्रामस्थांकडून वनविभागास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व आभार व्यक्त केले.
या जनजागृती अभियान यशस्वीतेसाठी सर्पमित्र संदीप मालचे , कुशल अग्रवाल , वनपाल एस टी पटाईत , वनरक्षक एस आर भोई , एस एस भोई , एस पी भालेराव , एस के कंखरे , व्हि डि सोनवणे , संदीप बारेला , डी पी देवरे , डी एम पालवे , आर डी बारेला उपस्थित होते.
WhatsApp
No comments:
Post a Comment