महिला मंडळ शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त निमित्त विविध कार्यक्रम संपन्न...
दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भगिनी मंडळ चोपडा संचलित महिला मंडळ व्हॉलंटरी स्कूल, चोपडा येथील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन तसेच भित्तीपत्रक प्रदर्शन आयोजित केले. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी यांनी केले. याप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. विनोद रायपुरे, महिला मंडळ बालक मंदिर येथील मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा कुलकर्णी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील चौधरी, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अरुण संदानशिव आदी मान्यवर उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, मोबाईलचे फायदे तोटे या ज्वलंत विषयावर विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारचे माहिती संकलन आणि सादरीकरण केली. हस्तकला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेली त्रिमित शिल्प,कागदकाम, पुठ्ठाकाम,मातीकाम, दगडावरील नक्षीकाम, चित्रकला आदींचे आकर्षक आणि टाकाऊ पासून टिकाऊ असलेले नमुने मांडण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी आणि चालू वर्षात सहभाग घेतलेल्या विविध स्पर्धांच्या निवडक नमुन्यांचे भित्तीफलक प्रसिद्ध करण्यात आले. डॉ आशिष गुजराथी यांनी अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो आणि त्यांच्यातील सुप्त गुण वृद्धिंगत होतात असे प्रतिपादन केले. डॉ. विनोद रायपुरे यांनी होतकरू विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे प्रोत्साहन मिळते त्यांच्यामध्ये नाविन्याची ओढ निर्माण होते आणि विज्ञानाच्या महत्त्वाची जाणीव त्यांना होते. सौ अपूर्वा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या नमुन्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण संदानशिव यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेत येऊन अतिशय उत्साहपूर्ण सुरुवात केली असे सांगत विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण संदानशिव, इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक जितेंद्र जोशी, सौ. दिपाली धनगर, हर्षल वाघ तसेच मिलिंद शाह, अजय बारी यांनी परिश्रम घेतले. प्रमोद वैद्य यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. शेवटी मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment