निसर्ग देतोय पर्यावरण पूरक होळी व धुलिवंदनाचा संदेश
नैसर्गिक संसाधनांचा काटकसरीने वापर काळाची गरज
चोपडा तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या सातपुडा पर्वतराजीत निसर्गातील वृक्ष वसंत ऋतु पासून बहरून आली आहेत .त्यातच फाल्गुन महिन्यात पांगारा , पळस , शाल्मली , सोनसावर , कुसुंब , कौशी , बोगनवेल या वृक्षांनी लाल , केसरी , शेंद्री , सोनपिवळा , बदामी रंगांची मुक्त उधळण सर्वत्र केलेली आढळून येत आहे . सकाळच्या प्रहरी या वृक्षांवर बुलबुल , हळद्या , तांबट ,शिंजीर , हरोळी , धनेश , टोई पोपट , कोकीळ सारख्या विहंगांची मधुरस व फळे चाखण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली असते . सकाळच्या प्रहरी निसर्गातील नीरव शांततेत पक्ष्यांचा किलबिलाट अधिकच सुरेल व अद्भुत आनंद देणारा जाणवतो.
याच फाल्गुन महिन्यात धुलिवंदनाचा आनंदोत्सव साजरा करताना मोठ्या प्रमाणात बालक व युवा वर्ग रासायनिक व विषारी रंगांचा मुबलक वापर करतात. हे रंग आपल्या त्वचेस , डोळ्यांना व शरीराला खूपच हानिकारक आहेत.
त्याऐवजी नैसर्गिक घटकांपासून इको फ्रेंडली रंगांचा वापर करणे अधिक सोयीचे ठरेल. फक्त विनोदाचा भाग म्हणून काही अज्ञात व्यक्ती मुके पशु जसे की गाय , बकरी , श्वान , मांजर यांच्या अंगावर व डोळ्यांमध्ये देखील या रासायनिक रंगांचा मारा करतात. त्यामुळे हे मुके जीव घाबरतात , सैरावैरा धावू लागतात. नंतर हा रंग त्यांच्या त्वचेला खाज निर्माण करतो. यावर पर्याय म्हणून मुके जीव आपल्या जीभेने त्वचा चाटतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात रासायनिक घटक शिरतात व शरीराला अपाय निर्माण करतात. या गोष्टीचा सारासार विचार करता अशाप्रकारे मुक्या जीवांवर कोणत्याही प्रकारे रंग फेकू नये. पृथ्वीवर फक्त दोन टक्के पाणी वापरण्यास उपलब्ध आहे. दरवर्षी उन्हाळ्यात जलस्त्रोत आटतात व पाणी टंचाई निर्माण होते. यामुळे जलसंसाधनाचा देखील काटकसरीने वापर करून अपव्यय टाळावा.
धुलीवंदन बरोबर होळी हा सण देखील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. होळीत जाळण्यासाठी प्रचंड प्रमाणात लाकूड वापरले जाते. यासाठी छुप्या मार्गाने वृक्षतोड होते.तर कधी वनक्षेत्रात गुपचूप प्रवेश करून शुष्क सरपण देखील गोळा केले जाते. जंगल परिसरातील काही पाड्यांवर लग्न समारंभ ,भंडारा , उत्तरकार्य इ. निमित्त च्या स्वयंपाकासाठी देखील वेळेवर सरपण मिळणे अवघड झाले आहे. अशा वेळी स्थानिक नागरिकांकडून शेजारील अथवा दूरच्या वन कक्षातून लाकूड मिळवले जाते. काही ठिकाणी जास्त वेळ होळी पेटत ठेवण्यासाठी लाकडांचा अतिरेक होतो. त्याऐवजी एक गाव एक होळी अथवा एक प्रभाग एक होळी या विचाराचा अवलंब करून व लाकडा ऐवजी शेणाच्या गोवर-यांचा वापर करणे अधिक योग्य असेल. जेणेकरून वृक्षांवर कुऱ्हाड चालणार नाही.
भारतीय संस्कृतीतील सण पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात. याच विचाराचा भाग म्हणून निसर्गातील वर्तमान पुष्पोत्सव देखील निसर्गपूरक जीवनशैलीसाठी साद देत आहेत त्यास आपण निसर्ग नियम पाळून प्रतिसाद द्यावा असे नम्र आवाहन सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था व वन विभाग चोपडा तर्फे करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment