पंकज महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न ...
पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. अविनाश राणे होते तर प्रमुख पाहुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा.डॉ. नितीन बारी होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. तद्नंतर महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यात त्यांनी वर्षभरात विविध विषयात स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले जात असल्याचे सांगितल.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे यांनी अहवाल वाचन केले. यात त्यांनी वर्षभरात महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा तसेच महाविद्यालयात राबवल्या गेलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.डॉ. नितीन बारी यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाचे विविध पैलू समजावून सांगितले व विद्यार्थी म्हणून काय भूमिका असली पाहिजे या विषयी मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून त्यांच्यावर जास्त श्रम घेतले तर जीवनात निश्चितच यशस्वी होऊ शकतो असे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास, परिश्रम व प्रामाणिक प्रयत्न ही त्रिसूत्री असल्याचे त्यांनी सांगितले.
जीवनात ज्या क्षेत्रात जाल, त्यात सर्वोच्च स्थानी राहण्याचा प्रयत्न करा. असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अविनाश राणे यांनी संस्कार व सकारात्मक विचार यांचे जीवनातील महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक राहिल्यास कोणत्याही संघर्षावर सहज मात करता येते, तसेच आई-वडिलांनी केलेले संस्कार जोपासणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.तदनंतर महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरीय परीक्षा, नियतकालिक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, युवारंग, महाविद्यालयात विविध विषयात आयोजित केलेल्या स्पर्धा यात चमकदार व गुणवंत कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. दीपक देवरे यांनी केले तर आभार प्रा. अरुण मोरे यांनी मानले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. संजय पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:
Post a Comment