चोपडा महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आणि तहसील कार्यालयासमोर निदर्शने व घोषणा .....
महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना फार मोठा कालावधी होवूनही त्याबाबत शासनाकडून अद्यापपावेतो कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. तथापी शासनाने याबाबत त्वरीत कार्यवाही न केल्यास संघटनेच्या आंदोलनाची रुपरेषा निश्चीत करण्यात आलेली आहे. या आंदोलनाच्या सर्वात महत्वाच्या व अंतिम टप्प्यानुसार जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे दि. 04 एप्रिल 2022 पासुन बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे.शासनाकडून आपल्या तत्वत: मंजूर करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा व अंतिम टप्पा असल्याने या बेमुदत संपात जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुके, सात उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांमधील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आंदोलनाच्या अनुषंगाने चोपडा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करुन, घोषणा देण्यात आल्या, त्या नंतर संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत- शा.नि. 1 मे 2021 अन्वये राज्यस्तरीय केलेला नायब तहसिलदार संवर्ग रद्द करावा. अ.का. संवर्गातून नायब तहसिलदार पदोन्नतीची प्रक्रीया तात्काळ पूर्ण करावी, महसूल सहाय्यक(लिपीक) रिक्त पदे तात्काळ भरती प्रक्रीया राबवून भरावीत, अव्वल कारकून (वर्ग-3) च्या वेतन श्रेणीतील तृटी दूर करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे, आकृती बंधात दांगट समिती अहवालानुसार पदे मंजूर करणे, इतर विभागाचे कामासाठी (संगायो, रोहयो, गौण खनिज, जातप्रमाणपत्र इ.) नव्याने आकृतीबंध तयार करणे, ना.तह. संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 टक्के वरुन 20 टक्के करणे.नवीन 27 तालुक्यांत महसुलेतर कामांसाठी पदनिर्मिती करुन पदे तात्काळ भरणे, बऱ्याच वर्षांपासूनची अस्थायी पदे स्थायी करणे या व इतर मागण्या आहेत.
महाराष्ट्र राज्यात वेळोवेळी पडणारा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पुरजन्य परिस्थिती तसेच निवडणूक अशा महत्वाच्या विषयांमध्ये महसूल कर्मचारी दिवस-रात्र व सुट्टीच्या दिवशी देखील काम करीत असतात. तसेच शासनाकडुन निर्गमित होणाऱ्या वेगवेगळया योजनांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा नेहमीच काम करण्याचा सहभाग मोठया प्रमाणावर असतो. असे असना सुध्दा शासनस्तरावरुन महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाची उदासीनता दिसून येत असल्याने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात जळगाव जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झालेले आहेत. या संपात चोपडा तालुक्यातील गट- ब, गट-क व गट-ड संवर्गातील एकूण 21 कर्मचारी सहभागी आहेत.या प्रसंगी चोपडा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.डी एम नेटकर, कार्याध्यक्ष श्री. महेश पानघंटीवार, सचिव श्री एच यु सैय्यद, उपाध्यक्ष किरण साळुंखे सह सचिव श्री एच बी हरपे, पी एस शिंपी, श्री. कपिल चौधरी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे श्री. अनिल मोरे, श्री. भरत चौधरी, संघटनेचे तालुका स्तरीय सर्व पदाधिकारी व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment