दुर्मिळ शृंगी घुबडाला वाचवण्यात सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेला यश...
पक्षी मित्र दांपत्याचे बर्ड रेस्क्यू व संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न...
शृंगी घुबडाला (Rock Eagle Owl) सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले...
गुरुवारी दि. 11 मे रोजी रात्री 10 : 30 वाजता एक मोठे घुबड रस्त्याच्या कडेला बसलेले आहे , ते उडू शकत नाही असा रेस्क्यू कॉल येथील पक्षी व वन्यजीव संवर्धक श्री हेमराज पाटील यांना दिनेश बोरसे यांच्याकडून आला. थोडाही विलंब न करता त्या ठिकाणी जाऊन ट्रान्सपोर्ट पिंजऱ्यात त्यांनी घुबड घरी आणले. प्राथमिक तपासणी केली. घुबडाला कोठेही जखम नव्हती , परंतु घुबड आजारी व अशक्त होते. अनेक दिवसांपासून त्यास शिकार मिळालेली नव्हती, उन्हाच्या तडाख्याने ते त्रस्त होते.
त्यानंतर पुढील 3 दिवस घरीच वेळोवेळी योग्य औषधोपचार , आवश्यक मांसाहार देण्यात आला. दुसऱ्या दिवशी घुबडाच्या तब्येतीत सकारात्मक बदल जाणवला. घुबडाची स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली , ट्रीटमेंट पिंजऱ्यात मातीचे मोठे जलपात्र भरून ठेवले होते, त्यात घुबड दिवसातून 4 ते 5 तास पाण्यात उभे राहून शरीरातील उष्णतामान कमी करण्याचा प्रयत्न करायचे. त्यानंतर 2 दिवसात घुबड चपळाईने हालचाल व पंखांची फडफड करू लागले. घुबडाच्या मुक्त हालचालींसाठी त्यास खास मोठ्या पिंजऱ्यात (4.l × 4.b × 4.w ) ठेवण्यात आले. ते अधून मधून मोठा आवाज देखील करू लागले. 3 दिवसानंतर ते नैसर्गिक अधिवासात उडण्यास सज्ज झाले. अशा महत्त्वाच्या घुबड पक्षी प्रजातीला वाचवण्यात यश आले, त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात रविवारी उशिरा रात्री सुखरूप सोडण्यात आले. सुश्रुषा व उपचार कामी सौ.अश्विनी पाटील व आर्यदीप पाटील यांचे अनमोल योगदान लाभले. तसेच ट्रान्सपोर्ट कामी श्री नितीन शिंपी यांचे सहकार्य लाभले.
अनेक पक्षी व घुबड दुर्मिळ होत चालले आहेत. दुर्मिळ होत असलेल्या घुबड प्रजातींपैकी ही एक प्रजात म्हणजे भारतीय शृंगी घुबड नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास, अंधश्रद्धेपोटी होणारी यांची शिकार , घुबड अपशकुन आहे, असा खोटा समज इ. कारणांमुळे यांची संख्या खूपच कमी झाली आहे. शृंगी घुबड वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कायद्यानुसार अनुसूची 2 मधील पक्षी असून त्याची शिकार करणे, त्याच्या अवयवांचा व्यापार वा तस्करी करणे, बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी आर्थिक दंडासह 4 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आहे, अशी माहिती पक्षी व वन्यजीव अभ्यासक श्री हेमराज पाटील (केंद्रीय समिती सदस्य - वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग, नवी दिल्ली) यांनी दिली.
घुबड हे निसर्गातील अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून शेतकऱ्यांचे व मानवाचे मित्रच आहेत. 1 घुबड वर्षाला साधारणता 350 ते 400 उंदीर मारते. शेतातील पीक व अन्नधान्याचे नुकसान करणाऱ्या उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवते. त्याचबरोबर इतर लहान सजीव यांचे देखील भक्षण करून निसर्ग साखळीतील संतुलन टिकविण्यास मदत करते. म्हणून त्यांचे संवर्धन करणे अनिवार्य आहे. पक्षी व वन्यजीव बचाव कार्यात सतत मदत करत असल्याने वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे श्री हेमराज पाटील व परिवाराचे अभिनंदन केले.
चोपडा व यावल वन विभागा साठी पक्षी व वन्यजीव बचाव कार्यासाठी मोफत सेवा
सहायता संपर्क क्रमांक - 9922085434.

No comments:
Post a Comment