चोपड्यात उद्या संध्याकाळी कवी ना .धों. महानोरांना श्रद्धांजली . . .
ज्यांच्या निसर्ग कविता अन् प्रादेशिक बोलीभाषेच्या वापरांनी गाजलेल्या लयबद्ध चित्रपट गीतांनी मराठी रसिकांवर गारुड केलं असे मराठी साहित्य प्रांतातील लोकमान्य रानकवी पद्मश्री ना.धों.महानोर यांचं नुकतंच 3 ऑगस्टला दुःखद निधन झालं . साहित्य, चित्रपट गीतं,संस्कृती, कृषी, राजकारण या क्षेत्रातील आपल्या लखलखत्या कामांनं मराठी सारस्वतात एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेल्या ह्या व्यक्तीमत्त्वाच्या जाण्यांनं महाराष्ट्राच्या साहित्य / कृषी विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे .
या रानकवी च्या प्रतिभा संपन्न वाणीचं श्रवण आपल्या चोपडेकरांनी अनेकदा विविध निमित्तानं केलंय . तेव्हा कवी ना .धों .महानोर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चोपडा येथे म.सा.प. शाखा चोपडाच्या पुढाकाराने व नगरवाचन मंदिर चोपडा, अखिल भारतीय साहित्य परिषद शाखा चोपडा यांच्या सहकार्याने उद्या दि. 8 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी संध्याकाळी 6 : 30 वाजता अमरचंद सभागृह, गांधी चौक चोपडा येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे .
मा.प्रा.अरुणभाई गुजराथी, कवी अशोक सोनवणे, माजी प्राचार्य राजेंद्र महाजन या मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या श्रद्धांजली सभेस मराठी रसिकांनी उपस्थिती दयावी असे आवाहन नगर वाचन मंदिर, अखिल भारतीय साहित्य परिषद व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने कार्यवाह व कार्याध्यक्ष अनुक्रमे गोविंदभाई गुजराथी, विलास पाटील यांनी केले आहे .

No comments:
Post a Comment