चोपडा (प्रतिनिधी) : - -
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अखिल विश्वाला गीता सांगून मार्गदर्शन करणाऱ्या, मुक्तिदाता, सर्वांचा तारणहार अशा श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला. तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून प्रसिद्ध पावला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचे नृत्यांच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्विपप्रज्वलन करुन तसेच भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रमुख अतिथी गीता नितीन काबरा, शैला राम सोमाणी, शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल इ. मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील शिक्षिका दिपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांनी श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित सुमधुर भावगीत सादर केले. प्रमुख अतिथी गीता काबरा यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णांच्या जीवनातील विविध प्रसंगांची माहिती सांगून सखोल मार्गदर्शन केले.
तत्त्वज्ञानाचा द्रष्टा, अध्यात्माचा महान उद्गाता, उपनिषदांच्या तत्त्वांचा समन्वयक, चिंतक आणि सृष्टीच्या विकासाच्या उत्कृष्ट प्रयोगासाठी सतत कार्यरत असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित प्रसंगांचे नृत्याच्या माध्यमातून इयत्ता चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्यांचे सादरीकरण केले. त्यासाठी त्यांना शाळेतील नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेचा संपूर्ण परिसर कृष्णमय बनला होता. श्रीकृष्णाष्टमीच्या निमित्ताने शाळेतील कलाशिक्षक देवेन बारी यांनी भगवान श्रीकृष्णांचे आकर्षक फलक रेखाटन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी पालक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
WhatsApp
No comments:
Post a Comment