ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्या व उपाय या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. चोपड्यातील नामांकित डॉ. प्राजक्ता भामरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुले आणि मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल, हार्मोन्स मध्ये होणारे बदल आणि मानसिक स्वास्थ या संदर्भात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आयुष्य एकदाच मिळते ते वाया घालवू नका, आभासी जगात रमण्यापेक्षा वास्तववादी जीवन जगा हे समजावून सांगताना एक चूक आयुष्यभर रडवते म्हणून योग्य वेळी जागे होऊन सतर्क राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मोबाईलच्या अतिवापराचा मेंदू आणि डोळ्यांवर होणारा विपरीत परिणामाविषयी बोलताना स्क्रीन टाईम कमी करण्यासंदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उपाय सुचविले. पुस्तके, आई-वडील आणि करियर तसेच ध्येयावर प्रेम करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. जलद गती मिळणाऱ्या यशापेक्षा सातत्य, जिद्द आणि मेहनतीने प्राप्त केलेले यश चिरकाल टिकणारे असते. समस्यांना घाबरून न जाता तणावांवर नियंत्रण करायला शिकता यायला हवे. त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन, व्यायाम आणि मेडिटेशन इत्यादी उपाय सुचविले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल, समन्वयक दिप्ती पाटील, अश्विनी पाटील आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेतील शिक्षिका वैशाली गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाखा बडगुजर यांनी केले. या कार्यशाळेच्या अनुषंगाने शाळेतील शिक्षिका शितल भावसार यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment