चोपडा (प्रतिनिधी) : - -
पक्षी व वन्यजीव संवर्धक श्री हेमराज पाटील यांची पक्षी सर्वेक्षणासाठी बांधवगड टायगर रिझर्व येथे निवड व यशस्वी सहभाग.....
चोपडा येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक तसेच पक्षी व वन्यजीव अभ्यासक श्री हेमराज पाटील यांची मध्यप्रदेश राज्यातील उमरिया जिल्ह्यातील भारतातील सर्वात जास्त वाघांची घनता असलेल्या बांधवगड नॅशनल पार्क व टायगर रिझर्व येथे 23 ते 26 मे 2024 दरम्यान झालेल्या राष्ट्रीय पक्षी सर्वेक्षण व संशोधन प्रकल्पात निवड करण्यात आली होती. भारतातील स्थानिक स्थलांतरित व निवासी पक्ष्यांचे सर्वेक्षण , डेटा कलेक्शन , छायाचित्रीकरण व शास्त्रीय नोंदी संकलित करण्यासाठी हा चार दिवसीय निवासी कॅम्प बांधवगड टायगर रिझर्व ऑथॉरिटी कडून आयोजित करण्यात आला होता. यात देशभरातील विविध राज्यातील 65 पेक्षा जास्त पक्षी अभ्यासक व संशोधकांची निवड करण्यात आली होती. या सर्वेक्षण कॅम्प दरम्यान सर्व सहभागी अभ्यासकांकडून जंगलाच्या नऊ वनपरिक्षेत्रात 198 पक्षी प्रजातींची सचित्र शास्त्रीय नोंदणी व सूची बनवण्यात आली. श्री हेमराज पाटील यांनी 79 पक्षी प्रजातींचा डेटा उपलब्ध करून दिला. सुवर्ण वाळू असलेल्या सोन नदी किनारी श्री हेमराज पाटील यांनी तीन गिधाड्यांच्या प्रजातींची छायाचित्रासह नोंद केली. या उपलब्ध माहिती द्वारे विविध पक्षी प्रजातींचे वितरण , एकूण संख्या , स्थलांतर मार्ग , जीवन चक्रातील घडामोडी इत्यादी विषयी माहिती संशोधन कार्यासाठी उपयोगात घेण्यात येणार आहे. मध्य भारतातील तीव्र 48 डिग्री तापमान स्थितीत पक्षी अभ्यासकांनी दररोज 25 ते 30 किलोमीटर पायी भटकंती करून पक्षी सर्वेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल बांधवगड टायगर रिझर्व चे उपप्रबंधक श्री प्रकाश वर्मा यांनी सहभागींचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन व आभार व्यक्त केले. या सर्वेक्षण कॅम्पच्या प्रथम दिनी उद्घाटन सत्रादरम्यान व्यासपीठावर उपस्थित बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे डेप्युटी डायरेक्टर प्रकाशजी वर्मा यांनी देशभरातील विविध राज्यातून आलेले पक्षी अभ्यासकांचे स्वागत केले व प्रास्ताविकातून मध्यप्रदेश वन विभाग द्वारा बांधवगड येथे आयोजित पक्षी सर्वेक्षणाचा उद्देश व महत्त्व विशद केले .यावेळी नेचर इंटरप्रिटेशनच्या व्यासपीठावर बांधवगड टायगर रिझर्व चे मुख्य वनसंरक्षक श्री.यु.के. सुबुद्धी साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या जगप्रसिद्ध व्याघ्र राखीव प्रकल्पाची 1968 मध्ये बांधवगड राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषणा करण्यात आली होती. हे जंगल 1536 पेक्षा जास्त चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापून आहे. या अभयारण्यात 200 पेक्षा जास्त संख्येने पट्टेरी वाघ , जंगली हत्ती , बिबट्या , कोल्हे , चितळ , हरीण , नीलगाय, अस्वल , रानगवा , रान डुक्कर , रान कुत्रे , लंगूर याचबरोबर अनेक प्रकारच्या विषारी व बिनविषारी सर्प प्रजाती 255 पेक्षा अधिक स्थलांतरित व स्थानिक पक्षी प्रजातींचा आढळ आहे. अनेक प्रकारचे वनवृक्ष , बहुत करून साल , मोह , बांबू , सपुष्प व अपुष्प वेली , गवत व वनस्पतींचे प्रकार आढळतात.
या जंगलात बांधवगड नावाचा किल्ला असून या किल्ल्यास अध्यात्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. प्रभू श्री रामचंद्र यांनी रावणाचा वध करून अयोध्येला परत जात असताना या ठिकाणी काही कालावधी निवास केला होता. लहान बंधू श्री लक्ष्मणजी यांना हा किल्ला त्यांनी बंधुप्रेमाचे प्रतीक म्हणून भेट दिला , तेव्हापासून या किल्ल्याला बांधवगड असे नाव पडले. त्यानंतर रेवा संस्थांच्या राजांनी या किल्ल्याला आपली राजधानी करून मध्य भारतातील साम्राज्य प्रस्थापित केले होते. एकेकाळी या जंगलात पट्टेरी पांढऱ्या वाघांचे देखील अस्तित्व होते , अशी माहिती मुख्य प्रबंधक श्री सुबुद्धी साहेब यांनी उपस्थितांना दिली. मध्य प्रदेश राज्य सर्वोत्तम वनक्षेत्रांच्या बाबतीत तसेच टायगर , लेपर्ड , वुल्फ , क्रोकोडाइल , व्हल्चर या वन्यजीवांच्या बाबतीत कॅपिटल स्टेट म्हणून भारतात आपली प्रतिष्ठा टिकवून आहे. याचे संपूर्ण श्रेय वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाते. उन्हाळी पक्षी सर्वेक्षणात प्रामुख्याने इमेराल्ड डव , ब्लॅक बेलीड टर्न , बीटर्न , विविध घुबड व गरुड प्रजाती , इजिप्शियन गिधाड , भारतीय गिधाड , किंग व्हल्चर अर्थात लाल डोक्याचे गिधाड या पक्षी प्रजातीं बरोबरच पट्टेरी वाघ , हत्ती , अस्वल , नीलगाय , चितळ , लंगूर व अनेक सरीसृप प्रजाती आढळल्यात.

No comments:
Post a Comment