एस. एच. पाटील यांच्या "मन मंथन" कविता संग्रहाचे प्रकाशन ..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

22/07/2024

एस. एच. पाटील यांच्या "मन मंथन" कविता संग्रहाचे प्रकाशन .....

चोपडा (प्रतिनिधी) : - - 
           एस. एच. पाटील यांच्या "मन मंथन" कविता संग्रहाचे प्रकाशन ..... 
           चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरातील निवृत्त कलाशिक्षक एस. एच. पाटील लिखित ' मन मंथन' या कवितासंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. दि. 21 रोजी ॲड. राहुल पाटील मित्र परिवारातर्फे आयोजित प्रताप विद्या मंदिरात झालेल्या या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नॅनो शास्त्रज्ञ तथा लेखक डॉ. एल. ए. पाटील हे होते. यावेळी मंचावर चोपडे शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी मयूर, ज्येष्ठ कवी अशोक सोनवणे, नगर वाचन मंदिराचे उपाध्यक्ष प्रा. एस. टी. कुलकर्णी, अ. भा. साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे कार्याध्यक्ष गोविंद गुजराथी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे कार्याध्यक्ष विलास पी. पाटील व कवी रमेश जे. पाटील हे उपस्थित होते. 
           यावेळी बोलताना प्रा. अरुणभाई गुजराथी म्हणाले, कविता आणि मानवता यांचा जवळचा संबंध असून कवितेत यमक नसले तरी चालेल पण गमक असले पाहिजे. मन मंथन या कविता संग्रहातील कवितांमध्ये मानवी संवेदना, समाजातील विविध घटकांचे निरीक्षण जाणवते असे सांगत एस. एच. पाटील यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. कविता तसेच साहित्य हे समाजाचे मन आणि भान जागवणारे असले पाहिजे. समाजाच्या प्रश्नांचा त्यात अंतर्भाव असला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. एल. ए. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात केले. याप्रसंगी ' मन मंथन 'कविता संग्रहाचे कवी एस्. एच्. पाटील यांनी प्रकाशन प्रसंगी, मला समाजात वावरतांना जे दृष्टिस पडत गेले, त्याचे निरिक्षण करतांना जे काही हृदयाला भिडले, मनात साठले त्याचे मंथन करत गेलो व जे काही अनुभवात आले ते नवीन पिढीला संस्कार, समाजभान, सेवा, त्याग या विचारांचा परिचय व्हावा या प्रामणिक हेतून कवितां मधून मांडण्याचा तसेच माझ्या विचारांचं नवनीत समाजाला देण्याचा अल्पसा प्रयत्न केला . अशा शब्दांत आपलं कविता संग्रहाचे कवी म्हणूनच मनोगत व्यक्त केले . प्रमुख अतिथी म्हणून कवी अशोक सोनवणे यांनी ' मनमंथन ' या काव्यसंग्रहाचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. तसेच माधुरी मयूर यांनी या कविता संग्रहातील कविता प्रयत्नवाद आणि कर्मवाद मांडतात असे सांगत कवितेच्या रुपात या पुस्तकाची मांडणी उपस्थितांसमोर केली. 
          या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक, पुस्तक परिचय व सूत्रसंचालन मसापच्या चोपडा शाखेचे प्रमुख कार्यवाह संजय बारी यांनी, पाहुण्यांचा परिचय विलास पाटील यांनी तर आभार प्रदर्शन कु. हर्षिका पाटील हिने केले. वैद्य शैलेंद्र महाले यांनी प्रा. धर्मसिंह पाटील यांच्या शुभेच्छांचे वाचन केले. ए. ए. ढबू यांनी वंदे मातरम गाऊन या कार्यक्रमाची सांगता केली. कलाशिक्षक पंकज नागपुरे यांनी पुस्तक प्रकाशना निमित्त आकर्षक फलकलेखन केले होते. याप्रसंगी आता विद्या मंदिराचे आजी-माजी शिक्षक, मसाप सदस्य व शहरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज