चोपडा (प्रतिनिधी) : - -
वादळी पावसानंतर चोपडा नगर परिषदेकडून युद्धपातळीवर उपाययोजना.....
चोपडा शहरात दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी झालेल्या जोराच्या वाऱ्यासह वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी आज शहराच्या विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांच्यासोबत स्वच्छता निरीक्षक, विद्युत अभियंता आणि नगर परिषदेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
धनवाडी फाटा, देशमुख संकुल, पंकज स्टॉप, मेन रोड आणि एकविरा नगर या भागांची बारकाईने पाहणी केली. पावसामुळे शहरात ठीकठिकाणी पाणी साचले होते, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. विशेषत : गटारींमध्ये प्लास्टिक अडकल्यामुळे पाणी साचल्याचे निदर्शनास आले. या पाहणी दरम्यान धनवाडी फाटा ते पंकज स्टॉप या परिसरात रस्त्यालगतच्या अतिक्रमणधारकांमुळे पाणी निचरा होण्यास अडथळा येत असल्याचे दिसून आले. मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितांना कडक सूचना देत अतिक्रमण त्वरित हटवण्याचे आदेश दिले. तसेच, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत, पुन्हा प्लास्टिक वापरल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्याची तंबी दिली. स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंखे व मुकादमांना आजच्या आज सर्व गटारीं मधील प्लास्टिक व कचरा काढून पाणी प्रवाहित करण्याचे आदेश दिले.
नगर अभियंता डीगंबर वाघ यांना ज्या ठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या गंभीर आहे, तिथे तात्काळ पर्यायी गटार व्यवस्था करून पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश देण्यात आले.
विद्युत अभियंता प्रमोद पाटील यांना वादळामुळे सैल झालेल्या तारा सुव्यवस्थित करण्याच्या आणि रात्रीच्या वेळी पथदिवे बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
शहरातील समस्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनीही फोनद्वारे प्रशासनाला अवगत केले होते. त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या टीमने तातडीने रस्त्यावर उतरून काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रशासन आपल्या दारी येऊन समस्या सोडवत असल्याचे पाहून शहरवासीयांनी या मोहिमेचे स्वागत केले.
या पाहणी दौऱ्यात स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंखे, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, शहर समन्वयक स्वप्निल धनगर, उमेश कापरे, मुकादम सुनील बाविस्कर, राहुल सपकाळे, जयेश बागरे आदी कर्मचारी सक्रिय सहभागी होते. "शहरातील जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी नगर परिषद प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे. नागरिकांनीही गटारीत प्लास्टिक टाकणे टाळावे व प्रशासनास सहकार्य करावे." असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी केले आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment