चोपडा (प्रतिनिधी) : - -
चोपडा नगरपरिषदेत माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा
चोपडा नगरपरिषद येथे आज माहिती अधिकार दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने माहितीचा अधिकार कायदा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. नम्रता सचिन पाटील होत्या. कार्यक्रमास चोपडा नगरपरिषदेतील नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रणव संजय पाटील, कर निरीक्षक यांनी माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत उपस्थित नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. माहिती अधिकार अर्जाची प्रक्रिया, नागरिकांना उपलब्ध असलेले माहितीचे अधिकार, सार्वजनिक प्राधिकरणांची जबाबदारी, माहिती देण्याची कार्यपद्धती तसेच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका याबाबत त्यांनी विविध उदाहरणांसह माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात नगराध्यक्ष सौ. नम्रता सचिन पाटील यांनी सांगितले की, माहितीचा अधिकार हा केवळ नागरिकांनी माहिती मागण्यासाठी वापरण्याचा कायदा नसून, तो प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक मजबूत करणारे प्रभावी माध्यम आहे. नगरपरिषदेच्या कामकाजात नागरिकांचा विश्वास वाढविण्यासाठी अचूक, पारदर्शक आणि नियमबद्ध प्रशासन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने कायद्याच्या तरतुदींची योग्य माहिती ठेवून नागरिकांना आवश्यक माहिती वेळेत आणि नियमानुसार उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, माहितीचा अधिकार हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करणारा लोकशाहीचा महत्त्वाचा दुवा असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींमध्ये माहिती अधिकार कायद्याबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली. पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने चोपडा नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीत माहिती अधिकाराचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम ठरला.
WhatsApp
No comments:
Post a Comment